⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

फुले मार्केटमध्ये अतिक्रमण विभागाचे पथक तैनात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । महात्मा फुले मार्केटमध्ये ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने या मागणीची दखल घेत फुले मार्केटमध्ये ”नो हॉकर्स झोन’च्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून फुले मार्केटमध्ये अतिक्रमण विभागाचे पथक तैनात केले आहेत.

महात्मा फुले मार्केट हे जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाकडून फुले मार्केटचा परिसर ‘नाे हाॅकर्स झाेन’ घोषित करण्यात आला हाेता. त्यानुसार काही दिवस या नियमाचे पालन करण्यात आले, मात्र काही दिवसांनंतर राजकीय हस्तक्षेप तसेच मनपा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे काही दिवसांत नियमांवर पाणी फेरण्यात आले हाेते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून फुले मार्केटमध्ये वाढलेले वाद, गुन्हेगारीच्या घटनांमुळे या ठिकाणी पुन्हा ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून पुन्हा नाे हाॅकर्स झाेनच्या अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. बुधवारी सकाळपासून अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले असून दिवसभर हाॅकर्सला व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला.

फुले मार्केटमध्ये ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाेंदणीकृत २३४ हाॅकर्ससाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडून लवकरच जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.