जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन आर्थिक वर्षांपासून वीज दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या वीज बिलात लक्षणीय घट होणार आहे.

नवीन दरानुसार वीज दरात १० ते १४ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याचा थेट फायदा घरगुती ग्राहकांना होणार असून, महिन्याच्या खर्चात काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा यासारख्या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, विजेच्या वापराच्या सर्व श्रेणींमध्ये दर कमी करण्यात आले आहेत. ० ते १०० युनिट वापरासाठी दर ४.७६ रुपयांवरून ४.३० रुपये करण्यात आला आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी ७.९६ ऐवजी ७.१० रुपये, ३०१ ते ५०० युनिटसाठी १३.५५ ऐवजी ११.६४ रुपये आणि ५०० पेक्षा जास्त वापरासाठी १४.५५ ऐवजी १२.६४ रुपये दर लागू होणार आहेत.
या निर्णयामुळे एप्रिलपासून वीज बिल कमी येणार असून, वाढत्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.












