जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली असून यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये जळगाव महापालिकेत १२ उमेदवारांचा समावेश आहे.

राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांनीही या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानेही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेत उमेदवारांवर दबाव होता का, याची शहानिशा करण्यासाठी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवलाय.

भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचललेय. राज्यातील ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार ४४ विजयी उमेदवार भाजपचे आहेत. तर २२ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यावर आता आयोगाने सविस्तर अहवाल मागवलाय.
महापालिकेत निवडून आलेल्या बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या, असे आदेश निवडणूक आयोगाने स्थानिक यंत्रणांना दिले आहेत. उमेदवारांनी माघार केव्हा घेतली, त्यांनी दबावाचा काही आरोप केला का? याची शहानिशा करून सविस्तर अहवाल द्यावा, असे म्हटलेय. काही ठिकाणी सत्ताधारी नेत्यांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.










