जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । एकनाथ शिंदेसह शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीवर संकटाचे ढग दाटून आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या बंडखोरीवरून राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सूचक विधान केलं आहे. ‘कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल’, असं खडसे म्हणाले आहे.
कल्याण-डोंबिवलीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्काराला खडसे आले होते.यावेळी ते बोलत होते.
यावेळी खडसे यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही. मात्र, राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं आहे. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होतं. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला, माझा जावयी, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी, यांच्यामागे चौकशी लावली, सगळं कुटूंब आठवड्याला ईडी कार्यालयात असायचं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सद्या जे राजकारणाबद्दल बोलताना हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे अस वरवर वाटत असलं तरी, या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे त्यामुळे हे सगळं घडत आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलचं. गेल्या ४० वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे कोणासोबत आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलं आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहे. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे, असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.