⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मंगेश चव्हाणांची मी काही आरती ओवळणार नाही : आ.एकनाथराव खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । मतदार सुज्ञ आहे. मतदार सर्वांचे ऐकतो पण तो विकासाला मतदान करतो. धन असो किंवा इतर काही असो ज्याने विकास केला आहे, त्यालाच मतदार साथ देतील. मी मंगेश चव्हाण विरुद्ध ईडीकडे तक्रार केलेली नाही, जर असे काही असेल तर त्यांनी दाखवावे. समजा उद्या किंवा नंतर केली तरी मला काही घाबरण्याचे कारण नाही. तो माझा राजकीय विरोधक नाही, त्यामुळे मी काही त्यांची आरती ओवळणार नाही. नोकर भरतीत मी पैसे घेतल्याच्या काही व्हिडीओ क्लीप असतील तर त्यांनी खुशाल दाखवाव्या, असे आव्हान आ.एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी दिले.

जिल्हा दूध उत्पादक संघ निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी जळगावातील घरी पत्रकार परिषद घेतली. प्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, नंदकिशोर पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते.

आ.खडसे म्हणाले की, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ निवडणुकीचा प्रचार आज थांबलेला असून उद्या निवडणूक होणार आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला दिसतो. जिल्हा दूध उत्पादक संघात गेल्या ७ वर्षात आम्ही केलेले उत्तम कार्य, अ ऑडिट, १०० कोटींचे बांधकाम, मिळालेला बोनस, दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा केलेला प्रयत्न यामुळे मतदार आम्हाला कौल देणार आहेत. मतदारांना विरोधकांच्या आरोपात काहीही रस नाही असे आम्हाला दिसून आले. आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, सर्व मतदारांना भेटण्यासाठी सहकार पॅनलचे सर्व उमेदवार भेटले. मतदारांना त्याचा आनंद झाला. प्रचाराच्या माध्यमातून एक सकारात्मक वातावरण निर्मिती झाली. गेल्या ७ वर्षातील प्रगतीचा आलेख मतदारांनी बोलून दाखवला. ७ वर्षात चांगली कामगिरी झाली त्यामुळे हा दूध संघ याच संचालकांच्या ताब्यात हवा अशी इच्छा मतदारांनी व्यक्त केली. शेतकरी कुटुंबातील उमेदवार आम्ही दिले आहेत. अतिशय चांगल्या मतांनी आमचे उमेदवार निवडून येणार अशी खात्री देवकर यांनी दिली.

खडसे म्हणाले, सहकार पॅनलने आजवर सहकाराचा अनुभव असलेले जाणकार उमेदवार देण्यात आले आहे. विरोधकांनी नवखे उमेदवार दिले आहेत. तूप चोरी किंवा इतर ज्या घटना घडल्या आहेत त्या प्रशासक मंडळ नेमणूक झाली त्या काळात घडलेल्या आहेत. प्रशासक मंडळाच्या काळात जे झाले ते कोणतीही मंजुरी न घेता करण्यात आले आहे. आम्ही न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. आजच याबाबत सुनावणी झाली असून लवकरच निर्णय देखील येईल. प्रत्येक वेळी आम्हाला न्यायालयात जावे लागते, पोलीस तक्रार घेत नाही, त्यामुळे सध्या राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करीत असल्याचे दिसून येते असे आ.एकनाथराव खडसे म्हणाले.

मंत्री आ.गिरीश महाजन यांनी माझ्या मुलाबाबत केलेले वक्तव्य समाजाला, मतदारांना पटलेले नाही. आ.मंगेश चव्हाण यांनी देखील मला जेलमध्ये टाकण्याची भाषा केली. मतदारांना ते काही पटले नाही. त्यांनी खुशाल असे वक्तव्य करावे. सत्तेचा दुरुपयोग होतो आहे. खोके आले आहे त्यातील काही नोटा बाहेर येऊ शकतात. सत्तेचा उपयोग, धनशक्तीचा वापर केला जाऊ शकतो असे आ.एकनाथराव खडसे म्हणाले.