जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला. नंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापन केली. मात्र यानंतर पक्ष चिन्हांवरून शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. शिंदे गट आम्ही सेनेतच असल्याचे सांगत आहे. मग असे असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहिजेच, कायद्यानुसार हेच योग्य आहे, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) म्हणाले. 40 वर्षाच्या राजकारणात मी अशा पद्धतीचे राजकारण कधीही अनुभवले नव्हते, असेही खडसे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
बंडखोर, फुटलेल्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यापासून सूट हवी आहे. त्यांनी जर आज म्हटले की आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालो आहोत, तर ते आजच अपात्र ठरतात किंवा त्यांना भाजपा, मनसे, प्रहार अशा कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावेच लागेल. आता पक्षात विलीन व्हायच्या आधी, अपात्रता टाळायची असेल तर त्यांना आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगावे लागत आहे.
‘इंदिरा गांधीच्या काळातही झाला होता वाद’
इंदिरा गांधींच्या कालखंडात खरी काँग्रेस कुणाची असा वाद निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला त्यावेळी चिन्ह गोठवले होते आणि दोघांनाही वेगळे चिन्ह दिले होते. तर ज्यांनी काँग्रेस स्थापन केली, त्यांचाच पक्ष असा निर्णय त्यावेळी झाला होता. आजही अशीच स्थिती आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असे खडसे म्हणाले.