⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Maharashtra Politics : जळगाव मनपा ‘ट्रायल’ यशस्वी झाल्यावर एकनाथ शिंदेंची ‘रियल ॲक्शन’

Maharashtra Politics : जळगाव मनपा ‘ट्रायल’ यशस्वी झाल्यावर एकनाथ शिंदेंची ‘रियल ॲक्शन’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात गेल्या दोन दिवसापासून एकच चर्चा रंगते आहे ती म्हणजे शिवसेना सरकार पडणार कि टिकणार! शिवसेनेचे जेष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) यांच्यासोबत आज ४७ आमदार सोबत असून त्याच बळावर ते भाजपच्या सहकार्याने सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सुरुवातीला ११ असलेली आमदारांची संख्या आज ४७ वर पोहचली आहे. वेगवेगळी कारणे, पक्ष नेतृत्वावर नाराजी करीत आमदार बाहेर पडत असून शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. साधारणतः वर्षभरापूर्वी जळगाव मनपात देखील हेच घडले होते. मनपावर सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मास्टर प्लॅन रचण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.राजूमामा भोळे यांच्यावर नाराजी व्यक्त करीत एक मोठा गट बाहेर पडला. शिवसेनेने त्याच गटाच्या बळावर मनपात सत्ता स्थापन केली. भाजपकडून याविरुद्ध विभागीय आयुक्त आणि न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. वर्ष उलटले तरी त्यावर निर्णय झाला नसून मनपाचा पंचवार्षिक काळ सुरळीत पार पडेल असे दिसते. एकंदरीत आज राज्यात घडत असलेल्या घडामोडींची राजकीय ट्रायल एकनाथ शिंदे यांनी जळगाव मनपातच घेतली असल्याचे म्हणण्यास काही हरकत नाही.

जळगाव मनपातील आजवरची सुरेशदादा जैन कम खान्देश विकास आघाडी कम शिवसेनेची सत्ता उलथवून टाकत वर्षभरात कायापालटचा वायदा करीत संकटमोचक गिरीश महाजन यांनी हिसकावून घेतली होती. जळगाव मनपात भाजपचे ५७तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक निवडून आले होते. विजयाचा भाजपने जंगी जल्लोष केला. एकीकडे भाजपचा जल्लोष तर दुसरीकडे शिवसेनेचे विचारमंथन असे चित्र तेव्हा पाहायला मिळाले होते. योगायोगाने तेव्हा राज्यात देखील भाजपचे सरकार होते. साधारणतः वर्षभराने राज्यातील भाजपची सत्ता गेली आणि सर्वच बिनसले. सत्ता असताना भाजपने काहीही ठोस काम न केल्याने नाराजी वाढली होती. जनतेत जशी नाराजी वाढली तशीच नाराजी अंतर्गत भाजपातही वाढली होती. भाजपातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेने खेळी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मास्टर प्लॅन रचण्यात आला.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असे म्हणण्याऐवजी शिंदे यांनीच तो रचला. आज ज्याप्रमाणे राज्यातील शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीचा फायदा भाजप उठविण्याचा प्रयत्न करीत आहे तसाच प्रयत्न वर्षभरापूर्वी जळगाव मनपात शिवसेनेने केला होता. जळगावातील भाजपचे काही नगरसेवक सुरुवातीला शिवसेनेने गळाला लावले. जळगावातील दोन-तीन नगरसेवकांवर नगरसेवकांना गळाला लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्यात देखील ५ आमदारांना ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जळगावात बाहेर पडलेला नगरसेवकांचा मोठा गट आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करीत होता. भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून त्यांच्यावर नगरसेवकांनी आरोप केले. आज राज्यात देखील तेच होतंय, सेना आमदार पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांवर नाराजी दाखवली आहे. जळगावातील काही नगरसेवक सुरुवातीला बंडखोरांना जाऊन सामील झाले होते मात्र नंतर पुन्हा स्वगृही येत त्यांनी आमच्या गळ्यात जबरदस्ती मफलर टाकला, असे त्यांनी सांगितलं. आज राज्यात देखील २-३ आमदार पुन्हा परतले असून आपली आपबिती कथन केली आहे.
हे देखील वाचा : Master Plan : राज्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ‘जळगाव मनपा पॅटर्न’

जळगाव मनपातील खेळी यशस्वी झाल्यावर शिवसेनेने मोठा जल्लोष केला. मूळ शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले. भाजपातील बंडखोर असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांचे पद देखील शाबूत राहिले. भाजपच्या गटनेत्याने व्हीप बजावला पण तो नगरसेवकांनी नाकारला. पुढे बंडखोरांनी थेट गटनेताच अमान्य असल्याचे सांगितले. सध्या राज्यात तसेच चित्र आहे. शिवसेनेचे प्रतोद आणि गटनेते हे बंडखोर आमदारांचेच झाले असून अगोदरच्या नेत्यांना नाकारण्यात आले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्य मंत्री पदाची ऑफर दिली असल्याने मुख्यमंत्री भाजपचा होणार हे निश्चित झाले आहे.

जळगावात भाजप नगरसेवकांनी बंडखोरी केल्यानंतर त्याविरुद्ध भाजपकडून नाशिक विभागीय आयुक्त आणि न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून त्यावर कामकाज सुरु आहे. बंडखोरांच्या वाऱ्या सुरु आहेत. सर्वांचे सुरळीत सुरु असून पक्षनेते निधी देखील उपलब्ध करून देत आहेत. राज्यात आपले सरकार असल्यानेच आपण आनंदी असल्याची भावना बंडखोर आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आहे. राज्यातील घडामोडी लक्षात घेता उद्या उठून एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो, काहीतरी कायदेशीर अडचणींचा अडसर निर्माण होऊ शकतो. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने उद्या काही झाले तरी आपल्याला किमान अडीच वर्षे तरी भाजप मदत करेल असा विश्वास एकनाथ शिंदे गटाला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांना जळगाव मनपाचा अनुभव असल्याने ते कायदेशीर बाबी व इतर घडामोडींवर ताक देखील फुंकून पिण्याची भूमिका स्वीकारून आहेत.

राज्यातील एकनाथ शिंदे यांची एकंदरीत भूमिका लक्षात घेता उद्या बंडखोर आमदारांच्या साथीने एकनाथ शिंदे भाजपच्या पाठबळावर सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला आणि उपमुख्यमंत्री झालेच तर जळगाव मनपावर घेतलेल्या ट्रायलचा प्लॅन शिंदे यांनी स्वतःचा आयुष्यात देखील प्रत्यक्षात आणला असे म्हणावे लागेल. एकंदरीत जळगावातील राजकारणावर बहुतांशवेळी राज्याचे राजकारण ठरत असते हे पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. जिल्ह्यातील राजकारणी राज्यातील सूत्र हलवीत असतात आणि अनेकदा जळगावची जागा सोडण्यावरून देखील राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाल्याचे आजवरचा इतिहास आहे. जळगाव मनपातील इतिहासाची पुनरावृत्ती होत असून एकनाथ शिंदेच सत्तेचे वजीर आहेत.



author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.