⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Master Plan : राज्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ‘जळगाव मनपा पॅटर्न’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात सध्या मोठी खळबळ उडाली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जळगाव मनपातील भाजपची संकटमोचक गिरीश महाजन यांनी प्रस्थापित केलेली सत्ता नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उलथवून टाकण्यात आली होती. वर्षभरापूर्वी ना.एकनाथ शिंदे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असली तरी त्यावेळी मोठे राजकीय नाट्य पहावयास मिळाले होते. आज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नाराज मंत्री आणि आमदारांचा एक मोठा गट नॉट रिचेबल झाला आहे. जळगाव मनपात जशा घडामोडी घडल्या होत्या तशाच काही घडामोडी आज राज्यात पाहायला मिळत आहे.

जळगाव मनपात आजवर जेष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या गटाची सत्ता होती. जैन यांच्या गडाला सुरुंग लावत भाजपचे संकटमोचक आ.गिरीश महाजन यांनी जळगाव शहर मनपावर भाजपची सत्ता प्रस्थापित केली होती. जळगाव मनपात कधी नव्हे तर तब्बल ५७ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. कधीकाळी कायम सत्तेत असलेल्या शिवसेनेला केवळ १२ जागेंवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला होता. एमआयएमने देखील आपले खाते उघडले होते. जळगाव मनपातील सत्ता गेल्याने शिवसेना विरोधात येऊन पोहचली होती. आपली सत्ता पुन्हा प्रस्थपित करण्यासाठी शिवसेना काही खेळी करेल असे कुणालाही वाटले नव्हते.

जळगाव मनपातील सत्तेला अडीच वर्ष पूर्ण झाल्यावर महापौर निवडीप्रसंगी जळगावातील शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडा उचलला. शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना बळ दिले ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व मुंबईत शिजले. गुप्त बैठक झाल्या निमित्त ठरले ते नवग्रह मंडळींचे. जळगाव, मुंबई वाऱ्या करीत शिवसेना नगरसेवकांनी जळगाव मनपातील डाव उलथविण्याचा मास्टर प्लॅन निश्चित केला. एका नगरसेवकाने तर याबाबत थेट संकटमोचक आ.गिरीश महाजन यांना देखील स्पष्टपणे सांगितले होते. भाजपातून बाहेर पडताना बंडखोर नगरसेवकांनी आ.राजूमामा भोळे भेदभाव करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सत्तापालटचा दिवस ठरला आणि सुरु झाले जळगाव जिल्ह्यातील महा राजकीय नाट्य. जळगाव शहरातून रातोरात वाहने भरून भाजप नगरसेवकांना पळविण्यात आले. जळगाव मनपात आताचे विद्यमान उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तो विडा उचलला होता. इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये सर्वांना ठेवण्यात आले होते. सकाळी जेव्हा बातमी फुटली तेव्हा काही नगरसेवकांचा असलेला हा आकडा हळूहळू वाढत गेला आणि बहुमतापर्यंत येऊन पोहचला. एका नगरसेविकेच्या पतीने तर पत्नी हरविल्याची तक्रार केली. पोलिसांचा हस्तक्षेप झाला. पैशांचा मोठा बाजार उठला. मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून होते.

हेही वाचा : Eknath Shinde Update : आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही – एकनाथ शिंदे

जळगावात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती आज राज्यात होते आहे. विधान परिषद निवडणूक पार पडली. रातोरात शिवसेनेचे आमदार अहमदाबादला गायब झाले. बंडखोरीचा विडा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलला आहे. बंडखोर आमदारांना सुरत येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते हरवले असल्याची तक्रार पोलिसात केली आहे. तक्रारीनंतर नितीन देशमुख यांना प्रकृती अस्वस्थामुळे दवाखान्यात हलविण्यात आल्याचे समोर आले आहे. आमदार थांबून असलेल्या हॉटेलच्या बाहेर देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपचे नेते त्याठिकाणी लक्ष ठेवून आहेत.

जळगाव मनपात खेळलेला डाव शिवसेनेने यशस्वी केला आणि मनपावर भगवा फडकला. आपली सत्ता प्रस्थापित करीत महापौरपदी जयश्री महाजन व उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. सर्व फोडाफोडीचे राजकारण केलेले कुलभूषण पाटील उपमहापौर झाले. जळगावात जसे घडले तसेच काहीसे चित्र आता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली असून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता नको असे म्हटल्याचे समोर आले आहे. ज्या शिंदेंच्या नेतृत्वाखाली जळगावात सत्तापालट झाला तेच शिंदे जळगाव पॅटर्न राज्यात वापरतात कि काय? असा प्रश्न उपस्थित केला जातात आहे.

जळगावात भाजपच्या नाराज नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला नाही तरी ते पद न गमावता ते सत्तेत कायम राहिले. इतकंच काय तर पद देखील मिळवले. राज्याच्या राजकारणात जर जळगाव पॅटर्न लागू करायचा असेल तर विशेष अधिवेशन बोलवावे लागेल किंवा गटनेते राज्यपालांकडे तसा प्रस्ताव देऊ शकतात असे राजकीय विश्लेषक सांगतात. जळगावातील नाराज बंडखोरांची नाराजी दूर करीत आपली सत्ता वाचविण्यासाठी भाजपने देखील धडपड केली होती मात्र त्यात ते अयशस्वी ठरले. राज्यात देखील शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यात ते कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.