जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । नगरविकास विभागाने भुसावळ येथील राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक दहा नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. या कारवाईमुळे एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या निलंबनाच्या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खडसे?
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी नगरपालिकेतील सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली. याप्रकरणी शासनाकडे दाद मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिल्याची खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
तसेच शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळाची वाट पाहत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जस जसा उशीर होतोय तस तशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आताही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. अशी टीका खडसे यांनी यावेळी केली आहे. तर गिरीश महाजनांनी एक हजार कोटींचे काम रद्द केलीत.त्यामुळं सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.
नगरसेवकांच्या निलंबनाचे नेमकं कारण काय?
भुसावळ नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग १ ब ), लक्ष्मी रमेश मकासरे ( प्रभाग १ अ ), सविता रमेश मकासरे ( प्रभाग २ अ ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे ( प्रभाग ६ ब ), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी ( ९ ब), शोभा अरुण नेमाडे ( २० अ ), किरण भागवत कोलते ( २२ ब ) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे ( प्रभाग १९ अ ) हे निवडून आले. मात्र त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच १७ डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपातून बाहेर पडताना राजीनामा दिला नाही. यानंतर भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे २९ डिसेंबरला याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होवून या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले होते.