जळगाव लाईव्ह न्यूज | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेकडून या मार्गावर दोन विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01021 ही विशेष साप्ताहिक गाडी आज २७ जून २०२६ रोजी पहाटे ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 01022 ही विशेष गाडी २७ जून २०२६ रोजी रात्री ९.४० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर या विशेष गाडीचा थांबा मिळाल्यामुळे मुंबई, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, सुट्टीच्या काळात आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर ही विशेष सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.






