मुक्ताईनगर : गुटख्याचा ट्रक जप्त करताच एकनाथ खडसे पोहोचले पोलीस स्थानकात

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२३ । काही दिवसापूर्वीच मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर आज रविवारी पुन्हा गुटख्याने भरलेला ट्रक जप्त करण्यात आल्याच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सध्या दोन नंबरच्या धंद्यांमुळे मुक्ताईनगर गाजत असून मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीअवैध गुटख्याबाबचा हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काही तासांमध्येच कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता.

यानंतर आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पुन्हा एकदा मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केला असून गुटख्याचा ट्रक मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आणण्यात आला आहे. या कारवाईच्या काही वेळानंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी गुटख्याच्या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईची माहिती जाणून घेतली. यासोबत त्यांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून याबाबत संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणी केली.