जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२६ । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू होणार होईल.

इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. दरम्यान दरवेळी १० ते १५ एप्रिलनंतर जी उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची तसं न होता उन्हाळ्याची सुट्टी ही मे महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणार आहे. १ मे रोजी शालेय निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिकृतपणे सुट्टी सुरू होईल.

विशेष म्हणजे यंदा सुट्टीचा कालावधीही तुलनेने कमी असणार आहे. कारण जून महिन्यात शाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे दिवस कमी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही आपल्या सुट्टीचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू होणार आहे. सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जूनमधील वाढत्या तापमानाचा विचार करून, शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत केवळ विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेतच भरवण्यात याव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत. हा बदल १५ जून ते २७ जून या कालावधीत लागू राहील. त्यानंतर ३० जूनपासून या शाळा नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार आहेत.












