जळगावात DYSP पथकाची सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई; ६० लिटर गावठी दारू नष्ट

मे 26, 2026 6:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२६ । जळगाव शहरात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला पोलिसांनी आणखी वेग दिला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या भागांत छापे टाकून पोलिसांनी ६ हजार रुपये किमतीची तब्बल ६० लिटर गावठी हातभट्टीची दारू उद्ध्वस्त केली. या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईने खळबळ उडाली

dde

​डीवायएसपी जळगाव भाग यांच्या कार्यालयातील पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनीपेठ पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिली कारवाई कांचन नगर परिसरात दुपारी १.५५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. शनीपेठ हद्दीतील खालची गल्ली, भैय्याची वखार जवळ कांचन नगर येथे एक महिला गावठी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, इंदुबाई भिकन ठाकरे (वय ५१, रा. कांचन नगर) ही महिला एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारू बाळगून तिची विक्री करताना आढळून आली. पंचांसमक्ष खात्री केली असता, ३००० रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. यातील नमुना बाटली काढून उर्वरित दारू जागेवरच नष्ट करण्यात आली.

दुसरी कारवाई वाल्मिक नगर भागात अवघ्या काही वेळातच आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. २१ नंबर शाळेच्या मागे, लेंडी नाल्याजवळ एका मोकळ्या जागेत छापा टाकला असता, तिथेही गावठी दारूची अवैध विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी जितेंद्र नारायण सैदाने (वय ४५, रा. वाल्मिक नगर, जळगाव) हा स्वतःच्या कब्जात दारू बाळगून विक्री करत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडूनही ३००० रुपये किमतीची एका ३५ लिटरच्या कॅनमध्ये असलेली ३० लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली व तीही पंचांसमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आली.

​या दोन्ही प्रकरणांत शनीपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा (मुं.प्रो.का.) कलम ६५ (ई) नुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पो.कॉ. सचिन साळुंखे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

​यांनी केली कारवाई:
ही धडक कारवाई जळगाव भाग उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कार्यालयातील पो.कॉ. सचिन सुरेश साळुंखे, अवेश शेख पो.कॉ. प्रणय सुरेश पवार, पो.कॉ. अमोल अशोक ठाकूर यांनी केली. या कारवाईत शनीपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद मन्सुरी यांना अवगत करून त्यांच्या सूचनेनुसार शनीपेठचे पो.हे.कॉ. विजय विनोद खैरे आणि महिला पो.कॉ. प्रतिभा पांडुरंग खैरे यांनीही सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories