शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

पाऊस रुसला! पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जळगावातील पेरण्या खोळबल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२३ । साधारण जून महिना पावसाळ्याचा असतो. मात्र जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाचा पत्ता नाहीय. अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पेरण्या खोळबल्या आहेत. 

एकीकडे राज्यात मान्सून दाखल असताना त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचे संकट आल्याने पाऊस खोळंबला. राज्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत असलं तरी मात्र पावसाने काही हजेरी लावली नाही.

जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत नांगरणी व वखरणी करून ठेवली आहे. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले असून, पावसाअभावी शेतीचे कामे थांबल्याची स्थिती आहे.

एकीकडे पावसाने दडी मारल्याने असून दुसरीकडे उकाड्यात मात्र वाढला आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. खरिपाच्या पेरण्यांवर शेतकऱ्यांची दिवाळी अवलंबून असते. खरिपासाठी मृग नक्षत्रातील पाऊस उपयुक्त मानला जातो. मात्र यंदाच्या मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन नऊ दिवस झाले तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही.

सुरवातीच्याच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास शेतकरी जूनअखेरपर्यंत उडीद, तुर व मुगाची पेरणी करतात. त्यानंतर पेरणी करण्याचे शक्यतो टाळतात. जुलैअखेरपर्यंत तूर आणि सोयाबिनची पेरणी करतात. पाऊस लांबला, तर उडीद आणि मूगाच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरिपातील प्रमुख पिके सरासरी क्षेत्र (हेक्टर)
कापूस : ५ लाख १ हजार ५६८
सोयाबीन : २९ हजार ६३८
तूर : १६ हजार ५०३
मका : ९८ हजार २५
उडीद : २६ हजार ३१२
मूग : २८ हजार ९६
ज्वारी : ४४ हजार ७३३
बाजरी : १५ हजार ७७४
दाळी : ७१ हजार ९८२