जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी एखाद्या गावात एसटीबस पोहचली नाही, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही! मात्र असेच एक जळगाव जिल्ह्यात होते. खामखेडा (ता.धरणगाव) हे त्या गावाचे नाव. जेमतेम ३०० मतदान असलेले हे गाव विकासापासून लांब होते. कारण या गावातून वाहत असलेल्या नदीवर पुल नव्हता. मात्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या गावात २ कोटी ६२ लाख रुपये खर्चून पुल बांधण्यात आला आहे. यामुळे हे गाव विकासाच्या मार्गावर आले आहे.
धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या सोनवदपासून ५ किमी अंतरावर खामखेडा हे एक छोटे गाव आहे. या गावातून पद्मालयातून उगम पावणारी झीरी ही नदी वाहते. नदीच्या एका बाजूला खामखेडा तर दुसऱ्या बाजूला अंजनविहिरे ही गावे आहेत. या गावाला जोडणार पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात झीरी नदीला पूर आल्यानंतर ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. यात सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वैद्यकीय उपचारापासून थेट अंत्यविधीसाठी जातांनाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असे. सदरची समस्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खामखेडा पुलासाठी निधीची तरतूद केली. त्यानंतर त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करुन पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जेंव्हा या गावात केवळ ३०० मतदान होते तेंव्हा पालकमंत्री ना.पाटील यांनी तब्बल २ कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर केला होता, अशी माहिती गावाचे लोकनियुक्त सरपंच धिरज गणेश पाटील यांनी दिली. आता या गावात ४५० मतदान असल्याचे त्यांनी सांगितले.
आता हा पुल झाल्यामुळे गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बस पोहचली. आधी बससाठी अंजविहीरे गावापर्यंत पायी जावे लागत होते. आता गावात बस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. ना.गुलाबराव पाटील यांनी फक्त पुलाचे काम न करता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अंजनविहरे फाटा ते खामखेडा २.५ किमीचा रस्त्याचे डांबरीकरण केले. खामखेडा पुल व डांबरी रस्त्यामुळे धारशेरी, पथराड, पाळधी, जळगाव या गावांमधून वाहतूक सुरु झाली. चोरगाव, चांदसर येथून अमळनेर,दोंडायचा येथे जाणारी वाहने आता खामखेडा गावातून जातात. यामुळे खऱ्या अर्थाने गावाचा विकास सुरु झाला असल्याचे सरपंच धिरज पाटील यांनी सांगितले. खामखेडा पुल व डांबरी रस्त्याचे काम पूर्ण करुन दिल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी ना.पाटील यांचे आभार मानले आहेत.