जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, एमडी ड्रग्जसह कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सुरेश दादा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एस-क्रॉस (एमएच-२९-बीसी-५१००) कारची तपासणी केली असता त्यामध्ये एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत जप्त करण्यात आलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.रईस हसन देशमुख (वय २७, रा. एमआयडीसी पोलिस कॉलनी, जळगाव), तोसिफ सय्यद आरिफ (वय २१, रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) आणि कुणाल उर्फ लकी रमेश पाटील (वय ३०, रा. देविदास कॉलनी, जळगाव) असं अटक केलेल्या तिघांची नाव आहे. चौकशीदरम्यान त्यांनी संबंधित अमली पदार्थ इतर साथीदारांकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
कारवाईदरम्यान १६.११ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, मारुती एस-क्रॉस कार, स्प्लेंडर प्लस आणि बजाज पल्सर या दोन मोटारसायकली तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.
जळगाव पोलिसांनी नागरिकांना अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.










