रावेरातील कंत्राटी आरोग्य सेविका बडतर्फ; झेडपी सीईओंच्या कारवाईने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात खळबळ

मार्च 13, 2026 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या दुर्दैवी प्रसूती प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कंत्राटी आरोग्य सेविकेला बडतर्फ केलं. नंदा कडू पाटील असं बडतर्फ केलेल्या सेविकेचे नाव असून या कारवाईने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली.

zp jalgaon Minal Karanwal

गारखेडा येथील रुकसान अजित तडवी या गरोदर महिलेला १० मार्च रोजी मध्यरात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. या घटनेची माहिती कंत्राटी आरोग्य सेविका नंदा पाटील यांना फोनद्वारे देण्यात आली होती. मात्र, नियमानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही त्या अनुपस्थित होत्या. ऐनवेळी आशा सेविकेने, स्वतःकडे असलेल्या एएनएम प्रशिक्षणाचा वापर करून उपकेंद्रातील साधनसामग्रीच्या मदतीने प्रसूती पार पाडली. प्रसूतीनंतर नवजात बाळ रडत नव्हते. त्या बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. प्राथमिक चौकशीत आरोग्य सेविका मुख्यालयी नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. यापुढे अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवाय मुख्यालयी राहण्याचे कर्मचाऱ्यांना सक्तीचे केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now