⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

एलसीबीच्या यादीतील ‘भाटिया’चा लाखोंचा गुटखा आयजींच्या पथकाने पकडला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यातील निलंबीत एलसीबी निरीक्षक किरण बकाले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एलसीबीकडून कलेक्शन केले जात असलेली एक यादी व्हायरल होत होती. यादीत भाटिया दिल्ली शिखर गुटखा १५ लाख असे नाव दिसत होते. सोमवारी नाशिक आयजींच्या पथकाने जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्यानजीक ६० लाखांचा गुटखा घेवून जाणारा कंटेनर पकडला. विशेष म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गुटखा मालक राजु भाटिया याचे नाव समोर आले असल्याने ‘त्या’ व्हायरल यादीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांना मध्यप्रदेश मार्गाने महाराष्ट्रात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस पथक पाठवून सोमवारी २० मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जामनेर रस्त्यावर सोनाळे फाट्यावर कंटेनरसह ६० लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ महिन्यात करोडोंचा गुटखा पकडण्यात आला आहे. प्रत्येक वेळी आकडे लाखोत असून ते दिवसेंदिवस फुगतच आहेत.

कंटेनर क्रमांक एचआर.४७ ल.डी.९८५६ या वाहनाचा चालक शराफत अली हसन महम्मद(वय३०) रा.चहलका तहसील तावडू जिल्हा नुहु राज्य हरयाणा, वाहन मालक इम्रान खान शाहबुद्दीन घसेरा रा. पलवल, राज्य हरयाणा, गोलु (मँनेजर) नाव गाव माहीत नाही, गुटखा मालक राजु भाटिया या चौघांनी संगनमत करून महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांनाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दिलबाग प्लस पान मसाला, ए प्लस तंबाखू, सुंगधित तंबाखू व सुपारी दिल्ली राज्यातून महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे विक्रीसाठी जात असतांना पकडण्यात आला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहोम, ए.एस.आय रवींद्र शिलावट, बशीर तडवी, पोलीस नाईक प्रमोद मंडळीक, मनोज दुसाने यांच्या पथकाने केली. आयजींच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे खरी पण त्यामागे कारण वेगळेच आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एलसीबी तत्कालीन निलंबीत निरीक्षक किरण बकाले यांच्या विरोधात मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले जात होते. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्याठिकाणी भेट दिली असता बकाले इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडं करण्याची धमकी देत असल्याचा आरोप झाला होता.

नेमके त्याच काळात एलसीबीकडून कलेक्शन केले जात असल्याच्या नावाने एक यादी आणि तब्बल १ कोटी रकमेचे आकडे सोशल मीडियात व्हायरल होत होते. यादीमध्ये गुटखा म्हणून भाटीया दिल्ली शिखर गुटखा अवैध – १५ लाख, हंसु शेठ गुटखा – ३.५ लाख रुपये सुशील गुटखा सिंधी – ३.५ लाख रुपये, विकी बहनपुर गुटखा – ३ लाख, जेसवानी गुटखा जळगांव – २ लाख रुपये, अशोक गुटखा – २ लाख, दिलीप २ लाख, रिंकु मेवा – २ लाख, कारडा चाळीसगांव – १ लाख, देवरे ५० हजार, पंकज सुपारी चोपडा जळगांव – ५० हजार अशी नावे व्हायरल होत होती. नुकतेच कारवाई करण्यात आलेल्या गुन्ह्यात राजू भाटिया दिल्ली याचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी भाटियाविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी यावरून भाटिया हा जळगावात आणि महाराष्ट्रात गुटखा पुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे.