⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दिलीपने स्वप्नीलच्या खुनाची सुपारी दिली : शिंपी समाजबांधवांचा आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । दोन दिवसांपूर्वी पाळधी येथे कापूस व्यापारी स्वप्नील खैरनार (शिंपी) याचा खून करण्यात आला होता. मयत स्वप्नीलसोबत असलेल्या दिलीप चौधरी याला काहीही दुखापत झाली नाही किंवा त्याने मारेकऱ्यांच्या वाहनाचा फोटो देखील काढला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. शासनाने लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावत मारेकऱ्यांना अटक करावी अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन पुकारू असा पवित्रा शिंपी समाजबांधवांनी रविवार पत्रकार परिषदेत जाहीर केला.

एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची दोन दिवसांपूर्वी पाळधी साईबाबा मंदिरापुढे महामार्गावर चौघांनी निर्घृण खून केला होता. दोन दिवस होऊन देखील मारेकरी हाती न लागल्याने स्वप्नीलला न्याय मिळावा या मागणीसाठी रविवारी अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल, मुकुंद मेटकर, उपराज्य संघटक मनोज भांडारकर आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी माहिती देत काही आरोप केले. स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेल्या दिलीपवर संशय व्यक्त केला आहे. संशय व्यक्त करण्यामागे कारण देखील तसेच आहे. दिलीप हा अनेक वर्षांपासून स्वप्नीलकडे काम करीत असल्याने त्याला व्यवसायाची संपूर्ण माहिती होती. त्याला देखील या व्यवसायात मालक व्हायचे होते, म्हणून त्याने हा डाव रचला. त्याने सुपारी देत हे काम करवून घेतले. त्याच्या अंगावर रक्ताचा एकही डाग नाही, स्वप्नीलविषयी त्याला थोडीफार देखील आस्था नाही. चारचाकी असताना देखील तो रुग्णवाहिकेची वाट पाहत बसला. घटनेनंतर दिलीपने कुटुंबियांना माहिती देताना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले, त्यामुळे अधिक संशय बळावतो. गेल्या दोन महिन्यापासूनचे दिलीपचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनची माहिती घ्यावी, अशी मागणी पोलिसांकडे करणार आहोत.

स्वप्नीलचा खून हा पैशांसाठी झाला नसून केवळ ४ ते ५ लाख रुपये सुपारी घेतलेल्या व्यक्तींना देण्यात आले असा आरोप देखील पत्रकार परिषदेत करण्यात आला. स्वप्नीलला न्याय मिळावा आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.