महावितरणच्या संचालक (संचालन) पदी धनंजय औंढेकर रुजू

जून 19, 2026 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून धनंजय औंढेकर यांनी गुरुवारी (१८ जून) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. औंढेकर गेल्या २९ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

New Project 5

नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर हे मूळचे औंढा नागनाथचे (जि. हिंगोली) रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी तसेच एमबीए (फायनान्स), एनर्जी ऑडिटर, नवी दिल्ली येथून अॅडव्हान्स सर्टिफिकेट इन पॉवर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे. संचालक औंढेकर हे १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून माजलगाव (जि.बीड) येथे रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. त्यानंतर २०१६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून अधीक्षक अभियंता तर २०१९ मध्ये पदोन्नतीने मुख्य अभियंता पदी निवड झाली. या विविध पदांवर श्री.औंढेकर यांनी बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कल्याण, मुंबई मुख्यालयात काम केले आहे.

संचालक (संचालन) श्री.औंढेकर हे २०२४ पासून कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंपमध्ये देशात प्रथम स्थान मिळवले. एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा जागतिक विक्रम केल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जाहीर केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावरील सौर प्रकल्पांमध्ये देशात द्वितीय स्थान पटकावले. या योजनेसाठी महावितरणने देशात सर्वप्रथम फेसलेस-पेपरलेस ही ऑनलाइन सुविधा सुरू केली. नवीन वीजजोडणी, ग्राहक नावात बदल आणि वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये संचालक श्री.औंढेकर यांचे मोठे योगदान आहे.

‘अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात सांघिक कामगिरीतून कंपनीला अधिक सक्षम, ग्राहकस्नेही व हरित ऊर्जेकडे नेण्यास आणखी प्राधान्य देण्यात येईल. नवीन वीजजोडणीची प्रक्रिया फेसलेस-पेपरलेस म्हणजे पूर्णतः ऑनलाईन करण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवा, वीज हानीमध्ये घट आणि महसूलवाढ हे मुख्य ध्येय आहे’, असे महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now