⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव महापालिका ऍक्शनमध्ये ; 1 एप्रिलपासून याबाबत राबविणार धडक मोहीम

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । शहरात कोणत्याही ठिकाणी जाहिरात लावायची असेल तर महापालिकेची परवानगी घेऊन त्याचे शुल्क भरणे अपेक्षित आहे. मात्र यातही कमी जाहिरातीची परवानगी घेऊन त्यापेक्षा अधिक फलक रस्त्यावर लावले जातात. तसेच काही ठिकाणी विनापरवानगी फलक लावलेले आढळून येतात. आता याबाबत महापालिका ऍक्शनमध्ये आली असून याविरुद्ध उद्या म्हणजेच एक एप्रिलपासून महापालिकेतर्फे धडक कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे.

जळगाव शहरामध्ये नागरिक व व्यावसायिकांनी जाहिरातीचे फलक (होर्डिंग्ज) विनापरवानगी लावल्याचे दिसून येत आहे, तसेच जाहिरात फलकधारकांनी, होर्डिंगधारकांनी महापालिकेची होर्डिंग लावण्यासंदर्भात परवानगी घेतली आहे.मात्र, जाहिरात फलक लावण्याची प्रत्यक्ष मागणी मंजूर संख्या व प्रत्यक्ष मंजूर संख्येपेक्षा जास्त जाहिरात फलक लावल्याचे आढळून आल्यास, अशा जाहिरात फलकधारकांचे होर्डिंग जप्तीची मोहीम शनिवार (ता. १)पासून राबविली जाणार आहे.

तद्‌नंतर अशांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार कारवाई केली जाणार आहे. याची संबंधित जाहिरात फलक (होर्डिंग) लावणारे नागरिक व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी.कोणी विनापरवानगी जळगाव महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जाहिरात फलक, होर्डिंग लावले असतील, अशांनी व जाहिरात परवानगी मागणी संख्येपेक्षा जास्त जाहिरात फलक लावलेले असतील, अशांनी आपले फलक तत्काळ काढून घेण्याची व्यवस्था करावी, असे जळगाव शहर महापालिका प्रशासनाने कळविले आहे.