जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२५ । तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेले काही निर्णय आता चौकशीच्या रडारवर आले आहेत. यात जालन्यातील (Jalna) सुमारे 900 कोटी रुपयांच्या किंमतीचा गृहनिर्माण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

खरंतर नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सिडकोने 2019 मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखला होता. प्रकल्पाची तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली. तपासानंतर हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष काढला गेला. त्यानंतर, सिडकोने हा प्रकल्प रद्द केला. हाच प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला.
मात्र हा प्रकल्पात भू माफियांनी अधिकारी व अहवाल तयार करणाऱ्या खासगी संस्थेबाबत आर्थिक संगनमत करुन अव्यवहार्य व न परवडणाऱ्या प्रकल्प शासनाच्या माथी मारुन सिडकोची 900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे केला असून त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमत्री फडणवीस यांना या प्रकल्पाबाबत तक्रार केली दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या तक्रारीला प्रतिसाद देत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान खरपुडी प्रकल्पास तातडीने स्थगिती देऊन भू संपादनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याची व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची विनंती संतोष सांबरे यांनी केली आहे.