जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२६ । राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनांपैकी एक असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार, अशी घोषणा केली. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं

दरम्यान, अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीची तरतूद केल्यानंतर विरोधकांनी २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काळजी करु नका, तुमच्या मनातील गोष्ट आम्हीच पूर्ण करणार. फक्त योजनेविरोधात कोर्टात जाऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते थांबले होते. काही महिलांचे तीन महिन्यांचे पैसे प्रलंबित होते. आता सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात झाली असून काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित लाभार्थींनाही लवकरच पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने पात्र महिलांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहनही केले आहे. अनेक महिला पात्र असूनही केवायसी न केल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा महिलांनी तातडीने केवायसी पूर्ण करावी, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.












