जळगाव लाईव्ह न्यूज । देशात विमान अपघाताच्या घटना सातत्यानं समोर येत असताना अशातच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आलीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात थोडक्यात टळला असून, सुदैवाने या घटनेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण सुखरूप आहेत. खराब हवामान आणि वादळामुळे हा प्रसंग ओढवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक हवामान बदलले आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर वादळाच्या कचाट्यात सापडले. काही काळ हेलिकॉप्टर हवेत हेलकावे खात असल्याने अत्यंत भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती.

वातावरण बिघडल्याचे लक्षात येताच हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रचंड प्रसंगावधान दाखवले. अत्यंत कठीण परिस्थितीतही पायलटने हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टाळली. पायलटच्या या कौशल्यामुळे मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
या थरारक प्रसंगानंतर सर्व स्तरांतून काळजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून पुढील प्रवासाबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.











