⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत देण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१। पाचोरा व भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून कोरडवाहू जमीनधारक शेतकऱ्यांना एकेरी २५ हजार तर बागायती शेतीसाठी ४० हजार प्रती एकर मदत करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे तात्काळ जमा करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे यांच्या नेतृत्वात या मागणीचे प्रशासनाला देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या उडीद, मूग, सोयाबीन इत्यादी पिकांची मागील काळात पावसात मोठा खंड पडल्याने पिकाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत पूर्णपणे नुकसान झाले होते. त्यावेळी देखील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षी जळगाव जिल्ह्यात पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता खरीप हंगामाच्या सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती. परंतु शेतकरी बांधवांनी उपलब्ध सिंचन सुविधेद्वारे पिके जतन करून जगवली होती. परंतु ऐन उत्पन्न येण्याच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके आडवी पडली असून त्यांना कोम फुटलेले आहेत. अशा परिस्थितीत कोरडवाहू जमीन धारक शेतकऱ्यांना एकेरी २५ हजार तर बागायती शेतीसाठी एकेरी ४० हजार रुपये मदत करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे तात्काळ जमा करण्यात यावेत, अश्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला देण्यात आले.

सरसकट पंचनामे करावे
यावेळी बोलताना अमोल शिंदे यांनी सांगितले की, सततच्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनामे करून कोरडवाहू जमीन धारक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रती एकर तर बागायती क्षेत्रास ४० हजार रुपये प्रती एकर मदत करावी व तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२१ मधील शासन निर्णयात अनुक्रमांक १०.२ मध्ये नमूद केल्यानुसार पूर परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याचे नमूद केलेले आहे. तरी या संदर्भात पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांकरिता अधिसूचना जाहीर करून संबंधित विमा कंपनी विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम वर्ग करण्याकरिता आदेश करण्यात यावे, अशा आग्रही मागणीचे निवेदन आम्ही दिले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. वेळप्रसंगी गरज पडल्यास रस्त्यावर देखील उतरु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी जि.प. सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, वीरेंद्र चौधरी, भैय्या चौधरी, आशिष जाधव आदी उपस्थित होते.