⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जामा मशिदीचा निर्णय : भोंग्यावरून अजान होणार नाही पण साईंची काकड आरती होऊ द्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । राज्यभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर भोंग्यावरून रणकंदन उठले आहे. दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची परिस्थिती असताना शिर्डीत मात्र मुस्लिम समुदायाने स्तुत्य भूमिका घेतली आहे. जामा मशिदीकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले असून भोंग्यावरून अजान होणार नाही परंतु श्री साईबाबांची काकड आरती आणि शेजारती होऊ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिर्डीतील निर्णय म्हणजे समाजकंटकांना जोरदार चपराक आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका लावून धरली होती. राज्य सरकारला त्यांनी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकार अल्टिमेटमनंतर अलर्ट झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी नागरिकांनीच समजूतदारीची भूमिका निभावत धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविले होते. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत सर्वच धार्मिक स्थळांना सूचना केल्या होत्या. पोलिसांच्या सूचनेमुळे रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत सर्र्व भोंगे बंद करण्यात आले होते. शिर्डी येथील श्री साई बाबांची काकड आरती देखील लाऊडस्पीकरने वाजविणे बंद झाले होते.

शिर्डीतील जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमुशुद्दीन इनामदार म्हणाले कि, मुस्लिम समाजानं आणि जामा मस्जिद ट्रस्टने काकड आरती, शेजारती भोंग्यांवरच व्हावी. त्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नयेत, अशी मागणी केली आहे. ‘शिर्डी हे सर्वधर्मसमभावाचं प्रतीक आहे. राज्यात सध्या भोंग्यांचा विषय तापला आहे. त्यामुळे आम्ही भोंगे बंद करण्याचा निर्णय घेत आहोत. मात्र काकड आरती, शेजारतीच्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नये. तसेच यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला देखील पत्र पाठविले आहे.