जळगाव लाईव्ह न्यूज । वरणगाव शहरातील सम्राट नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील १० युनिट महार रेजिमेंट मधील नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५) यांचे अरुणाचल प्रदेशात सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झाले.

वीर जवानाचे पार्थिक सेना दलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे बुधवार, 26 बुधवारी रात्रीपर्यंत पोहोचणार आहे. शहिदाच्या पार्थिवावर २७ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
अरुणाचल प्रदेशातील नियुक्तीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी गस्त घालताना अर्जुन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेथून त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. अर्जुन बावस्कर १५ वर्षांपासून कर्तव्य बजावत होते. सेवानिवृतीला दोन वर्षे बाकी असताना त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.