नुकसान भरपाई अनुदानात सव्वा कोटींचा अपहार; पाचोऱ्याच्या सहायक लिपिकासह दोघांवर गुन्हा, असं फुटले बिंग?

सप्टेंबर 1, 2025 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । पिके घेताना शेतकऱ्यांना अनेक संकटाचा समाना करावा लागतो. त्यातही विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी शेतकऱ्यांना बरीच वाट पाहावी लागते. मात्र यातही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेवर सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून डल्ला मारला जात असल्याचे प्रकार समोर आलेय.

farmer loan

असाच एक प्रकार पाचोरा येथून समोर आलाय. ज्यात खरीप हंगामातील नुकसानभरपाई अनुदानाची १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम पाचोरा तहसील कार्यालयातील सहायक लिपिकासह एका प्रशिक्षणार्थीने परस्पर बोगस लाभार्थ्यांच्या नावे नोंदवून अपहार केला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक लिपिक अमोल सुरेश भोई (२८, रा. पाचोरा) आणि युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण (२२, रा. कृष्णापुरी, पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकार?

राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ व २०२४-२५ या दोन वर्षात बाधित एकूण ३४७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती. मात्र बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले. यात शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या बनावट स्वाक्षऱ्याही आढळल्या आहेत. तहसीलदारांचा लॉग इन आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करण्यात आला. अपहाराची रक्कम तब्बल १ कोटी २० लाख १३ हजार रुपये एवढी आहे. याबाबत पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी फिर्याद दिली.

असे फुटले बिंग?

भरपाईचे अनुदान खात्यात जमा होत नसल्याबाबत गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लाभार्थ्यांची मूळ यादी ग्रुपवर पाठवताच अमोल भोई याने संबंधित लिपिकाला यादी अपलोड करू नका, माझ्याकडे मूळ यादी आहे…. ती टाकतो, असे सांगितले. मात्र, त्याचे न ऐकता संबंधित लिपिकाने यादी अपलोड केली. आंबेवडगाव येथील तलाठी यांनी यादीची प्रत चावडीवर लावली. यावर लाभार्थ्यांची नावे आणि आधार नंबर वेगळाच असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पैसे अन्य गावातील लोकांना दिल्याचे आढळले. सर्वच गावांमधील यादीची छाननी करण्यात आली. त्यातून मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. भोई यास चौकशीसाठी बोलावले असता त्याने या अफरातफरीची कबुली दिली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now