जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात कोर्टाने एकनाथ खडसेंसह कुटुंबियांना मोठा धक्का दिला आहे. तो म्हणजे या प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी दाखल केलेला आरोपमुक्ततेचा अर्ज मुंबईतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

काय आहे प्रकरण?

भोसरी भूखंड प्रकरण २०१६ मधील आहे. एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला. त्यांनी हा भूखंड बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून खडसेंसह पत्नी अन् जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे खडसे यांना मंत्रीपदही सोडावे लागले होते.
या भूखंड प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात आला. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी खडसेंसह सर्वांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्येच खडसे यांना ‘क्लीन चीट’ दिली होती. पण सत्तापालट होताच ‘एसीबी’ने या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचा अर्ज न्यायालयात दाखळ केला. त्यानंतर खडसे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना पुणे न्यायालयाने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.
या प्रकरणात खडसे यांनी मुंबईतील कोर्टात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. खडसे कुटुंबियांना त्यामुळे मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.






