⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

कपाशी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून सात लाखाची लूट; चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । पहूर ( ता.रावेर ) येथील सोनाळा फाट्याजवळून कापूस व्यापारी मोटरसायकलने जात असताना त्यास अज्ञात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ७ लाख रुपये लुटून नेल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध पहूर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तरअसे की, सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. आज ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान पप्पू ती स्टॉल पासून 200 मीटर अंतरावर मोटरसायकलवर दोन जण त्यांचा पाठलाग करत होते. तर तलावाजवळ आधीच दोन जण थांबलेले होते. आज दि.२४ नोव्हेंबर रोजी, सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून घेतली. आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली.

 

घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पहूर पोलिस स्टेशनचे पीआय अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांनी भेट दिली. या बाबत कपशी व्यापारी संजय पाटील यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध ४५७, २०२१ भादवि कलम ३९२,३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे, हंसराज मोरे हे करीत आहे.