गुरूवार, जून 8, 2023

कापसामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावर वाढतोय कर्जाचा डोंगर; हे आहे कारण…

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : मार्च महिन्यात खरिपातील कापूस विकला जाऊन शेतकर्‍यांच्या हातात रक्कम असते. त्यातून शेतकरी घेतलेल्या कर्जांची परतफेड करतो अन् पुढील हंगामाच्या तयारीला लागतो. मात्र, कापसाला योग्य दर नसल्याने कापूस घरातच आहे. व्यापार्‍यांच्या मते किमान ८० टक्के कापूस अजूनही शेतकर्‍यांच्या घरातच पडून आहे. ‘कापसाला दहा हजारांचा दर मिळत नाही, अन् शेतकरी कापूस विकत नाही’, अशी परिस्थिती आहे. कापूस घरात पडून पडून पिवळा पडत चालला आहे.

गत वर्षी कापसाला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यामुळे यंदाही तसाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. परिणामी, दरही नाहीत. सध्या आठ हजार रुपयांच्या आसपास भाव फिरत आहे. शेतकर्‍यांनी गरजेनुसार थोडा थोडा कापूस विकला मात्र खरीप हंगामातील ८० टक्के कापूस अद्यापही शेतकर्‍यांकडे पडून आहे. शेतकर्‍यांच्या हातात रोख पैसे नसल्याने शेतकर्‍यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजावर व्याजात रोज वाढ होत आहे.

पुढच्या महिन्यानत खरीप हंगामाची तयारी सुरु होईल, पाऊस पडला की, बियाणे, खतांसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरु होईल. तेंव्हा पैसा कुठून उभा करायचा? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना आतापासून सतावत आहे. आगामी दिवसांमध्ये कापसाचे दर वाढतील की नाही? याबाबतीतही सांशकता आहे. शेतकर्‍यांनी कापसाला थोड्या थोड्या प्रमाणात विकावा. दराबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही. कापूस घरात पडून दर्जा खालावतोय. वजन कमी होतो, याचाही विचार शेतकर्‍यांनी करीत कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.