कापसाला मिळत नाही भाव : त्यात कापूस चोरटे सुसाट

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेत शिवारातुन अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या कापूस व ३८ हजार रुपयांचे साहित्य असा एकुण ३ लाख ८८ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी कि, पाचोरा तालुक्यातील नांद्रा ते पहाण शिवारात नांद्रा येथील शेतकरी शरद बळीराम पाटील यांची गट क्रं. ६७ मध्ये शेत जमिन आहे. त्यांच्या शेतातील गोडाऊन मधुन दि. २६ फेब्रुवारी सायंकाळी ७:३० ते दि. २७ फेब्रुवारीच्या पहाटे ६:३० वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांना आज सकाळी दिसून आले.

यात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलुप तोडुन गोडाऊन मध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करत गोडाऊन मधील ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ७० क्विंटल कापुस, ३० हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर, बॅटरी व सोलर, २ हजार ४०० रुपये किंमतीचा मंदिरातील ३ किलो वजनाचा पितळी घंटा, ५ हजार रुपये किंमतीचे होन्डा कंपनीचे पाण्याचे पिटर मशिन, १ हजार रुपये किंमतीची गॅस शेगडी असा एकुण ३ लाख ८८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला.