⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सत्कार स्वीकारण्यापूर्वीच कोरोना याेद्धा कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात बुधवारी स्वच्छता अभियानांतर्गत मनपा वाॅटर ग्रेस कंपनीच्या सफाई कामगाराचा ‘सन्मान स्वच्छता याेद्धा’ म्हणून सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार स्वीकारण्यापूर्वीच एका कोरोना याेद्धा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विशाल चंद्रकांत सपकाळे (वय २९) असे मृत कामगाराचे नाव आहे.

खेडी येथील आंबेडकरनगरातील रहिवासी असलेला विशाल सपकाळे हा वाॅटरग्रेस कंपनीच्या माध्यमातून शहरातील साफसफाईचे काम करीत हाेता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता कामगारांचा स्वच्छता याेद्धा म्हणून सन्मान कार्यक्रमाचे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयाेजन करण्यात आले हाेते. या वेळी कामगारांना हायजेनिक किटचेदेखील वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी महापाैर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित हाेते. कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाबाहेर निघत असताना विशाल सपकाळे या तरुणाला छातीत वेदना झाल्याने ताे काेसळला. त्याला त्वरित रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विशालच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.