⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

देशात कोरोनाची चौथी लाट? 4 महिन्यांनंतर आढळले ‘इतके’ रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । देशात कोरोनाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,336 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची ही चौथी लाट तर नाही अशी शंका वक्त होत आहे. या दरम्यान 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, देशात कोविडच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 88,284 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,33,62,294 लोकांना कोविडची लागण झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी देशात कोरोनाचे १३,३१३ रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत कोविड प्रकरणांमध्ये 30.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 5 लाख 24 हजार 954 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यूचे प्रमाणही आता 1.21 टक्क्यांवर पोहोचले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 13,029 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९८.५९ टक्के नोंदवला गेला आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 4.32 टक्के झाला आहे, तर साप्ताहिक सकारात्मकता दर 3.07 टक्के झाला आहे.

सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून येत आहेत
देशात सर्वाधिक कोविड रुग्ण महाराष्ट्रात येत आहेत. गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची 5,218 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर साथीच्या आजारामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 79,50,240 झाली असून एकूण मृतांची संख्या 1,47,893 वर पोहोचली आहे.

दिल्लीत ४ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक प्रकरणे
त्याचवेळी राजधानी दिल्लीत गुरुवारी कोविड-19 चे 1,934 नवीन रुग्ण आढळून आले आणि संसर्गाचा दर 8.10 टक्के होता. यादरम्यान दिल्लीत महामारीमुळे मृत्यूची कोणतीही घटना घडलेली नाही. काल नोंदवलेली नवीन प्रकरणे 4 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक दैनंदिन प्रकरणे आहेत.