जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२५ । राजकीय वर्तुळावर शोककळा पसरवणारी एक दुर्दैवी घटना समोर आलीय. कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून बुलढाणाच्या (Buldhana) चिखलीमधील काँग्रेस नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ सत्येंद्र भुसारी असं मृताचे नाव असून या घटनेने चिखलीवर (Chikhali) शोककळा पसरली असून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

डॉ सत्येंद्र भुसारी (Dr Satyendra Bhusari) हे बुलढाणाच्या चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती होते. सत्येंद्र भुसारी हे काही कामासाठी मुंबईला आले होते. काम आटोपल्यानंतर ते रेल्वेने चिखलीकडे निघाले होते.

पण कसारा घाटात काळाने घाला घातला. मुंबईवरून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेतून पडलेल्या भुसारी यांना तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र सत्येंद्र भुसारी यांच्या अकस्मात निधनानं चिखलीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. डॉ भुसारी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मात्र जबर धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भुसारी यांचं निधन झाल्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.









