जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरु आहे. मात्र यातच फोटो व पक्ष चिन्ह असलेले गृहपाठाचे पुस्तक दिवाळी भेट म्हणून जामनेर तालुक्यातील वाकोद येथील जिल्हा परिषद शाळेत वाटप केले. याबाबत अॅड.डी.एस. राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग झाल्याची ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो व पक्ष चिन्ह असलेल्या गृहपाठाच्या पुस्तकाचे दिवाळी भेट म्हणून २६ ऑक्टोबर रोजी वाटप केले. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर केली आहे. ही बाब गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत वाकोद जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
त्याचबरोबर वाटप केलेल्या या पुस्तकाचा खर्च निवडणूक खर्चात दाखवला किंवा नाही, याबाबतही तपासणी करण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या सुट्टया लागण्यापूर्वी वाकोद येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेत्याचे फोटो पक्षाचे नसलेल्या पुस्तकाचे वाटप केले. तसेच स्टेटसही आपापल्या मोबाइलला ठेवले. याबाबत सी व्हिजन या निवडणूक आयोगाच्या एप्लीकेशनवर तक्रार केली. ती तक्रार कार्यवाहीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याचा खुलासाही संबंधित अॅपवर केला असल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली.