मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

अनुकंपाधारक ९ पोलीस पाल्यांना महसूल विभागात शासकीय नोकरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२३ । जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत शासकिय नोकरी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांने या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ‘क’ संवर्गातील १० जागांसाठी १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली.‌ कागदपत्रांच्या पडताळणी नंतर ९ उमेदवारांना आज अंतिम नियुक्ती पत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रक्रिया प्रक्रिया राबविणारे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार पंकज लोखंडे, अवल्ल कारकून योगेश पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता वाघ, रियाज पटेल यांचे कौतुक करुन सदर अनुकंपा नियुक्तीबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले.

यांना मिळाले शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र

तलाठी पदावर छाया चैत्राम झटके, दामिनी धर्मेंद्र महाजन, शितल राजेश राजपुत, सोनाली रमेश कोळी, रेणुका रमेश पाटील, शितल राजेंद्र अवस्थी तर लिपिक टंकलेखक पदावर रितेश विजय पवार, हर्षल ब्रिजलाल पाटील व मृणाल मधुकर मेहरूणकर यांचा समावेश होता.