⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आयुक्त इन ऍक्शन : शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने दिले ‘हे’ निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ ।  शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या विरोधात नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात ओरड होत आहे. शहरातील खड्डे असह्य झाल्यामुळे आता नागरिकांकडून आंदोलने होऊ लागली आहेत.अश्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपा अधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागातील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर सर्व प्रमुख रस्त्यांची आधी दुरुस्ती करण्यासाठी शहरातील १२ मीटर रस्ते व त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची यादी तयार करुन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले.

शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी रस्त्यांची पाहणी केली. यात शिवाजीनगर, खोटेनगर, निमखेडी शिवार, पिंप्राळा परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांची त्यांनी माहिती घेतली. तसेच उर्वरीत भागातील रस्त्यांची देखील त्यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांना १२ मीटर रस्ते व त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची माहिती मागविली. अभियंत्यांनी दिलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून या यादीनुसार ८६ प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील सर्व ९ मीटर रस्त्यांची यादी तयार करुन बुजविले जाणार आहेत. हे झाल्यावर

६ मीटर व इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविले जाणार आहेत. तसेच ४२ कोटी रुपयांमधील १० रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सुचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व संबधित मक्तेदारांना देण्यात आले आहेत. पाहणी करतांना शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, नगररचना विभागाचे शकिल शेख, अतुल पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर पुलाच्या टी मार्गाचे काम सुरु करण्याच्या सुचना
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुल सुरु करणे, ४२ कोटींमधील रस्त्यांचे काम सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या ‘टी’ आकारासाठीच्या साळुंखे चौकाकडील आर्मचे काम सुरु करण्यात यावे, असे मनपाचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही विभागाची माहिती घेऊन शहरातील रस्त्यांचे डब्ल्यू बीएम करुन शिवाजीनगर पुलावरील वाहतुक सुरु करण्यासाठी आठ दिवसात राहिलेले काम पुर्ण करावे आणि साळुंखे चौकाकडील आर्मचे पिलर उभारण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत