जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल झालाय. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी झाली होती. त्यात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली. आता राज्यातील वातावरण कोरडे होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे आज सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा कडाका वाढणार आहे.
जळगावसह राज्याच्या अनेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली होती. यामुळे रात्री थंड वाऱ्यामुळे थंडी जाणवत होती. आज ३० डिसेंबरपासून उत्तर पश्चिम भारतात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. यामुळे महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढणार आहे.
गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. रात्रीचे किमान तापमान १९ अंशापर्यंत पोहोचले होते. तर दिवसाचे कमाल तापमान २९ वरुन ३० अंश झाले. मात्र रविवारी किमान तापमान १६.८ अंशापर्यंत घसरले. कमाल तापमानही २७.४ अंशापर्यंत खाली आले. यामुळे रात्री थंड वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती.
आजपासून थंडी वाढणार
जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली, उत्तराखंड भागात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या रात्रीपासून शहरात थंडी वाढणार असून, नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली