जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । केळी पिकावर वेगाने पसरत असलेल्या ‘सीएमव्ही’ व्हायरस या संसर्गजन्य रोगाने रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यात शिरकाव केला असून सुमारे १ ते २ लाख लागवड झालेली केळी रोपे उपडुन फेकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील अनेक भागात ‘सीएमव्ही’ व्हायरसचा पादुर्भाव आढळुन येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यातील जुन-जुलै महिन्यात मोठ्या कष्टाने लागवड करुन उभ्या केलेल्या टिश्यु केळी रोपांना अवघ्या तीन महिन्यातच उपडुन फेकण्याची वेळ काही शेतकरी बांधवांवर आली आहे. वसंत पंढरीनाथ पाटील यांच्या शेती गट नं ४० मधील १५ हजार , गट नं 87 मधील 6 हजार केळी झाडे तर ऍड. पवनराजे पाटील यांचे गट नं ४३ व ४६ मधील १५ हजाराच्यावर असलेल्या केळीबागा सीएमव्ही व्हायरस मुळे उपडुन फेकाव्या लागल्या. दरम्यान अनेक केळी बागांत कमी-अधिक प्रमाणात या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसुन येत असून लागण झालेली खोडे अनेक शेतकरी बांधवांकडून उपडुन फेकण्यात येत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून आर्थिक विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. या व्हायरसवर अद्यापर्यत कोणतेही ठोस औषधोपचार नसल्याने शेतकरी वर्ग हताश आहे. निंबोळी अर्काची केळीबागात तसेच बांधावर दर आठवड्याला फवारणी केल्याने काही प्रमाणात हा रोग आटोक्यात येवु शकतो अशी प्रतिक्रिया कृषी विभागाच्या सुत्रांकडुन समजते मात्र हा रोग आटोक्यात येण्यासाठी विविध उपाययोजना वापरुन, निरनिराळे औषधी फवारणी करुनही हा रोग आटोक्यात येत नसुन शेवटी प्रभावित झालेल्या केळीरोपाला उपडुन फेकल्याशिवाय पर्याय उरत नसल्याने शेतकरी हताश आहे.परीसरात जैन कंपनीच्या टिश्यु कल्चर रोपाची लागवड सर्वाधिक असुन कंद पद्धतीने लागवड केलेल्या बागांतही या व्हायरसचा पादुर्भाव आढळुन येत आहे.
यापुर्वीही वेळोवेळी आलेल्या वादळांसह इतर संकटांमुळे परीसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज निर्माण झाली असुन येत्या २० सप्टेंबरला मुख्यमंत्री यांचा उपमुख्यमत्र्यांसह मुक्ताईनगरला दौरा आहे.मुख्यमंत्र्यांच्या मुक्ताईनगर भेटीदरम्यान या समस्येबाबत लक्ष द्यावं अशी तुर्तास अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी बांधवांकडुन आहे.