Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये सुमारे ८५ मिली ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी बंधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, महाबीज च्या पर्जन्यमापकात अचूक मोजणी होत नसल्याने अतिवृष्टीची नोंद होत नसल्याचा आरोप आ. अनिल पाटील व माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी केला आहे.
अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये सुमारे ८५ मिली ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रविवारी आ. अनिल पाटील यांनी माजी आ. कृषिभूषण पाटील तसेच तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सोबत घेत रत्नापिंप्री, शेळावे बु., शेळावे खु., चिखलोड, दहिगाव, मोहाडी, दगडी सबगव्हाण, राजवड यांनी ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थ मंडळ व शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व राज्य शासनाने तत्काळ पंचनामे करून, नुकसानग्रस्त भागासाठी व शेतकऱ्यांसाठी तत्काळ मदत जाहीर करावी. त्या परिसरातील ना दुरूस्त व खराब पर्जन्य मापक यंत्र तात्काळ बदलून चांगल्या प्रतीचे पर्जन्यमापक यंत्र बसवून मिळावे, जेणे करून पावसाचे अचूक पर्जन्यमान मिळून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या भागातील ना दुरूस्त व खराब पर्जन्यमापक यंत्रामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षा पासून पडणाऱ्या ओला दुष्काळ मुळे नुकसान भरपाई आज तागायात मिळाली नसल्याचेही यावेळी उघड झाले. यावेळी माजी आ कृषिभूषण पाटील यांनी या नुकसानीच्या बऱ्याच बाबी आमदारांसमोर मांडल्या.
विमा कंपनीचे हित जोपासण्याचा हा प्रकार
यासंदर्भात आ. अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, महाबीज कंपनीच्या पर्जन्यमापक यंत्रातून चुकीचे मोजमाप होत असल्याचे निदर्शनास आले आहे, महसूल ची यंत्रे अचूक मोजमाप दाखवीत असताना महाबीज चे मोजमाप चुकीचे कसे, विमा कंपनी चे हित जोपासण्याचा हा प्रकार असेल शासनाच्या ते निदर्शनास आणून दिले जाईल, याभागात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने पिके हातची गेली आहेत, यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ निकष बदलवणे आवश्यक आहेत, याठिकाणी संपूर्ण मका आडवा झाला असून कापूस पीक मुळासकट सडत आहेत, यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना आमची मागणी आहे की या महसूल मंडळात पिकांचे सरसकट पंचनामे करून संपूर्ण शेतकऱ्यांना अतितातडीची मदत जाहीर करावी आणि यापुढे अचूक पर्जन्यमाप कसे होईल त्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.