पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या पाचोरा येथील जाहीर व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव लाईव्ह न्यूज । श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल फाउंडेशनच्या वतीने शिवतीर्थ मैदान, जयकिसान कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय व्याख्याते व हिंदुत्वाची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेल्या पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाने पाचोरा नगरीत राष्ट्रवाद, सनातन संस्कृती आणि भारतीय विचारधारेचा जागर घडवून आणला. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी रंगमंचावर परमपूज्य विष्णुदास महाराज, हभप जळकेकर महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात श्रद्धेय तात्यासाहेबांच्या कार्याचा भावपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी तब्बल ३५ वर्षांपूर्वीच शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळले पाहिजे, असा दूरदृष्टीपूर्ण विचार मांडला होता. रासायनिक खतांचा वाढता वापर भविष्यात शेतीसाठी घातक ठरेल, असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. आज जैविक शेती ही काळाची गरज बनली असून तात्यासाहेबांचे विचार किती दूरदर्शी होते, याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निर्मल सीड्सच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक व जैविक शेतीचे मार्गदर्शन करत शेती विकासासाठी आयुष्य समर्पित केल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर आपल्या ओजस्वी व अभ्यासपूर्ण शैलीत बोलताना पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांनी भारतीय संस्कृती, सनातन राष्ट्रवाद आणि राष्ट्रचेतना या विषयांवर प्रखर भाष्य केले. “देश आणि राष्ट्र या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत,” असे सांगताना त्यांनी अत्यंत समर्पक उदाहरणांद्वारे विचार मांडले. देशाला सीमा असतात, संविधान असते आणि त्यात बदल होऊ शकतात; मात्र राष्ट्र ही संस्कृती, परंपरा, विचार आणि सनातन मूल्यांनी घडलेली व्यापक संकल्पना असून त्याला सीमा नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, स्वाभिमान, संस्कृतीरक्षण आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांवर उभे राहणारे समाजच भविष्य घडवू शकतात. भारतीय संस्कृती ही केवळ परंपरा नसून जगाला दिशा देणारी जीवनपद्धती आहे, असे सांगत त्यांनी युवकांना राष्ट्रप्रेम, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी या व्याख्यानाला “विचारांची जागृती करणारा अनुभव” अशी प्रतिक्रिया दिली. संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ह भ प डॉ.योगिता चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मधुभाऊ काटे यांनी व्यक्त केले.











