पालिकेच्या शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांवर विनाकारण ख्रिसमस लादू नये !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । अनेक शाळांमध्ये त्यातही विशेष करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस साजरा करण्याचे फॅड वाढत चालले आहे. यात बहुतांश शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्याना विनाकारण ख्रिसमस साजरा करायला लावण्यात येतो. सांताक्लॉजची वेशभूषा ही करायला लावली जाते. हिंदूंचा ख्रिसमस शी काडीचाही संबंध नसताना त्यांना हे करायला लावणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे जळगाव महानगर पालिकेच्या हद्दीतील शाळांनी विनाकारण हिंदू विद्यार्थ्यांवर ख्रिसमस अणि सांताक्लॉज लादू नये या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना दिले.

निवेदनावर हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, गोवर्धन गोशाळेचे सुनील चौधरी, व्यावसायिक प्रशांत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, निखिल कदम, व्यावसायिक पवन सिंधी आदींनी सह्या केल्या.


निवेदनात म्हंटले आहे की, शाळेत हिंदू पालक त्याच्या पाल्याला शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. त्यासाठी योग्य ती ठरवून दिलेली फी सुद्धा भरतो, परंतु जर त्यांना शालेय आवारात ख्रिस्ती संस्कृतीचे शिक्षण दिले जात असेल, तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. शाळा ही विद्येची केंद्रे आहेत, त्यांना कृपा करून धर्मांतराचे अड्डे बनवू नका. एखाद्या शाळेत जर ख्रिस्ती समाजाचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी अवश्य ख्रिसमस करू शकता; पण हिंदू विद्यर्थ्यांना जर ख्रिसमस करायला लावले तर ते चुकीचे आहे. महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झालेला आहे, त्यानुसार सांताक्लॉज या काल्पनिक पात्राचे शाळेत उदात्तीकरण करणे म्हणजे अंधश्रद्धेचा प्रसार करण्यासारखे आहे. त्यामुळे या कायद्यानुसार ही कारवाई करता येऊ शकते.

महानगर पालिकेच्या शाळेत अशी सक्ती केली जात नाही आणि जाणारही नाही ! – उपमहापौर
जळगाव महानगर पालिकेच्या शाळेत अशी कोणतीही सक्ती केली जात नाही. तसेच केलीही जाणार नाही. या निवेदनाची योग्य ती दखल घेण्यात येईल.