⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दूध संघ अपहार प्रकरणातील मुख्य संशयीत सी.एम.पाटील यांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । जिल्ह्यात गाजत असलेल्या दुध संघातील अपहार प्रकरणात शहर पोलिसांनी आज मुख्य सुत्रधार सी.एम.पाटील यांना अटक केली. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अटकेतील आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी दाखल आहेत. यातील जबाबानुसार दुध संघात एकूण एक कोटी 15 लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी सोमवार, 14 नोव्हेंबर रात्री नऊ वाजता संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशीनाथ पाटील, अनिल हरीशंकर अग्रवाल आणि रवी मदनलाल अग्रवाल यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यांना अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मानले जणारे सी.एम. पाटील यांना शहर पोलिसांनी अयोध्या नगरातून बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अटक केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक झाली आहे. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, पोलिस नाईक संदीप पाटील यांनी केली.