जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री झाल्यानंतर ना.एकनाथ शिंदे पहिल्यांदा जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून जळगावकरांना त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जळगाव मनपावर भगवा तर फडकावला मात्र आता शिवसेनेतच फूट पडल्याने जळगाव मनपाला निधी मिळेनासा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावकरांच्या विश्वासाला जागतील अशी भाबडी अपेक्षा नागरिकांना लागून आहे. दरम्यान, शहरातील रस्ते आणि परिसराची अवस्था लक्षात घेता पत्रकार विजय वाघमारे यांनी आहुजा नगरातील नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना चांगलेच चिमटे घेतले आहे. दोन फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत.
विजय वाघमारे यांची पहिली पोस्ट….
मुख्यमंत्री महोदय…कोपरापासून तर ढोपरापर्यंत नमस्कार…मूळ विषय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो…उद्या तुम्ही माझ्या घरावरून (आहुजा नगर) येणार आणि जाणार आहात, असं शासकीय कार्यक्रमावरून समजले. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा…येतांना किंवा जातांना आमचा गोंड्याच्या टोपीचा सत्कार स्वीकारावा, अशी विनंती…कारण महापालिकेने दिलेल्या सुविधांनी आम्ही नागरीक प्रचंड भारावलेले आहोत.
आमच्या जळगाव महापालिकेत जे सत्तांतर झाले. त्यावेळी तुमचे खूप मोठे सहकार्य होते, अशी एक चर्चा ऐकण्यात आली होती. त्यामुळे आमच्या कॉलनीवासीयांच्या वतीने तुम्हीं गोंड्याच्या टोपीचा सत्कार स्वीकारावा, अशी आमची इच्छा आहे. अगदी शक्य नसेल तर फक्त काच खाली करून आम्हाला आपल्या दर्शनाचा लाभ दिला तरी तुमचे उपकार होतील. आमच्या घरात पावसाच्या पाण्यासोबत आजारही शिरताय. पण ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार होतात, या उपकाराची परतफेड करण्यासाठी तुमचा सत्कार करून सेवेची संधी देत आम्हाला उपकृत कराल, अशी आशा आहे.
अगदी आम्हा जळगावकरांना शोषित जनतेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करावा, या आशयाचे निवेदन देखील आपल्याला द्यायचे आहे. आमच्या समोरचा स्वीकृतीवाला बिल्डर बिल्डींग विकून मोकळा झालाय. त्यांच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसल्यामुळे आम्ही आमच्या अंगणात त्याचा मनसोक्त आनंद उपभोगतोय. तसेच दवाखान्यांचे भरमसाठ बिल भरून जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राच्या भरभराटीत अनमोल योगदान देखील देतोय. जळगावातील बिल्डर लोकांचे किस्से ऐकायचे असतील तर आमच्या तिवारी साहेबांचे काबरा पुराण एकदा वाचून घ्याल.
आमच्या भागातील नगरसेवक कुणी हॉटेल बांधण्यात तर कुणी प्लॉट खरेदी-विक्रीत व्यस्त आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. तसेच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांच्याबद्दल बोलून तुमचा वेळ वाया घालणार नाहीत, याचे जाहीर आश्वासन देतो. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लोकनेते असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे तुम्हालाच कळकळीची विनंती करण्याशिवाय आमच्याकडेही पर्याय नाहीय. बाकी तुमचा सत्कार करण्याची आम्ही आहुजानगर, मनुदेवी, वृदांवन सोसायटीवासी आतुरतेने वाट बघतोय. कळावे, लोभ असावा…!
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
विजय वाघमारे यांची दुसरी पोस्ट….
हे मनमोहक दृश्य नेमकं कुठलंय, या विचारात पडू नका. माझ्या अंगणात अवतरलेली ही नदी आहे. या नदीचे उगमस्थान स्वीकृती ड्रीम होम्स’ नावाची सोसायटी आहे. माझं एक स्वप्न होतं की, असावे एक आपले टुमदार सुंदर घर…नदीच्या किनारी ! . त्यामुळे स्वप्नांच्या घरात राहत असलेली मंडळीने माझा स्वप्नभंग होऊ नये, म्हणून ही तरतूद केलेली दिसतेय.
या सोसायातील माझी मित्र मंडळी सांगते की, आमच्या बिल्डरने महापालिकेला काहीतरी ४० लाख रुपये विकासनिधी वैगरे जमा केला आहे. त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग व्यवस्थित करण्यासह इतर जबाबदारी पालिकेची आहे. असं असेल तर आम्ही आहुजा नगरवासी देखील वर्गणी गोळा करून पालिकेत भरायला तयार आहोत. फक्त पालिकेने आमचे सांडपाणी स्वीकृतीच्या दारात नेऊन सोडावे, अशी आमची मागणी आहे.
अहो…आपण पायातलं खेटर देखील दुसऱ्याच्या दारात काढत नाही, मग सांडपाणी दुसऱ्याच्या अंगणात कसं रवाना करू शकतो?. याचा विचार करायला नको का?…म्हणून म्हणतोय मुख्यमंत्री महोदय आज येतच आहात जळगावात, तर आमचा गोंड्याच्या टोपीचा सत्कार स्वीकारा…!
पालिकेच्या दृष्टीने आमच्या भागात जनावरं राहतात. शिंदे साहेब ही जनावरं चक्क माणसांसारखी दिसतात हो…हे बघून तुम्हाला एलियन अर्थात परग्रही प्राणी बघितल्यागतचा आनंद होईल, याची शंभर टक्के खात्री देतो…अगदी आपलं मनोरंजन न झाल्यास आपल्या पेट्रोलचा खर्च परत करण्याचेही आश्वासन देतोय. तर येताय ना मग…आम्ही वाट बघतोय बरं !
दुसरं असं की, माझा मुलगा पाच दिवस दवाखान्यात उपचार घेऊन घरी आल्यापासून अंगणातील नदीत पोहायचा हट्ट धरतोय. बालकाचा हट्ट पूर्ण करू की नको?, या संभ्रमात मी आहे. आपल्या सोबत पालिकेचे अधिकारी आल्यास मला निर्णय घेण्यास सोपं जाणार आहे. तसेच माझ्या अंगणातील नदीचे नामकरण देखील करायचे आहे. कडवी नदी, जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी यापैकी कोणत नावं चांगल राहील, हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुचवावे, ही देखील नम्र विनंती!
जळगाव शहर #जळगाव_महापालिका
विजय वाघमारे यांनी लिहिलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा होत असून त्यावर कमेंट्सचा देखील पाऊस पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचा ताफा त्याच रस्त्याने धरणगाव जाणार आहे. वाघमारे यांच्यासह आहुजानगर वासियांच्या विनंतीचा मान ठेवत मुख्यमंत्री गोंडयाची टोपी स्वीकारतात कि काही आश्वासन देण्यासाठी थांबतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.