इतिहास घडला! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच गडावर पार पडला शिवरायांचा अभिषेक

मार्च 6, 2026 5:51 PM

सोयगावकरांचा ‘स्वाभिमानी’ पायी सोहळा!

जळगाव लाईव्ह न्यूज । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासात आज एक सुवर्णपान जोडले गेले. निमित्त होते ‘तिथीप्रमाणे’ साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवाचे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका किल्ल्यावर शिवरायांचा राजेशाही अभिषेक सोहळा संपन्न झाला आहे. सोयगाव येथील शिवभक्तांनी केवळ पारंपरिक मिरवणूक न काढता, ऐतिहासिक वेताळवाडी किल्ल्यावर भव्य पायी पालखी सोहळा नेऊन महाराजांना वैदिक मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक घातला. या अनोख्या आणि संस्कारक्षम उपक्रमाची चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

shivaji maharaj abhishek

छत्रपती शिवरायांनी सकल हिंदू समाज, बारा बलुतेदार, अठरापगड जाती यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. परंतु आज अनेकजण स्वार्थापोटी समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. आपण असेच जातीपातीत भांडत राहिलो तर पंचवीस वर्षानंतर काळ मोठा वाईट असेल. त्यामुळे आपसी मतभेद विसरून हिंदुत्वासाठी सदैव एकजूट रहा असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी व प्रकुख वक्ते जसवंत सिंह यांनी केले. ते सोयगाव येथील शिव जन्मोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मान्यवर म्हणून रा.स्व.संघाचे स्वंयसेवक कल्पेश जोशी, राजेशिवबा प्रतिष्ठान चे भागीनाथजी, राजा शिवछत्रपती परिवाराचे भरतजी बोचरे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे डॉ. पवनगिरेजी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांनी पूर्ण आयुष्यभर हिंदू धर्म रक्षण व धर्मस्थापना करण्यासाठी कार्य केले. महाराजांचे विचार जाणून घेण्यासाठी खरा इतिहास माहित करून घेतला पाहिजे आणि इतिहासाचे विकृतीकरण रोखले पाहिजे असे प्रतिपादन कल्पेश जोशी यांनी केले. तर महाराष्ट्रातील गडकोट हेच आपले खरे वैभव आहे. त्यांना संरक्षण आणि संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा महत्त्वपूर्ण किल्ले असून त्यांची देखरेख नीट झाली पाहिजे.तसेच गडकोटावर होणारे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढून टाकण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन भागीनाथ शिरके यांनी केले.

गडकोटांचे जतन व्हावे आणि तरुण पिढीला इतिहासाची खरी ओळख व्हावी, या उदात्त उद्देशाने सोयगाव तालुक्यातील “समर्पण फाउंडेशन”ने या ‘पायी पालखी सोहळा’ आणि ‘गडकोट मोहिमेचे’ आयोजन केले होते. सोयगावच्या छत्रपती Shivaji महाराज चौकातून सकाळी ठीक ८ वाजता या शोभायात्रेला भगव्या वातावरणात प्रारंभ झाला. या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘वैदिक मंत्रोच्चारातील दुग्ध अभिषेक’. अत्यंत भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला, त्यानंतर गडावर विधीवत ‘शस्त्र पूजन’ देखील करण्यात आले.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सोयगाव तालुक्यातील २० गावांतील शेकडो शिवभक्त एकत्र आले होते. भालदार-चोपदार, शिस्तबद्ध ध्वजधारी आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराने वेताळवाडी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या गोंगाटापेक्षा परंपरेचा हा गजर अधिक प्रभावी ठरला.

आजकाल शिवजयंतीच्या नावाखाली डीजे आणि कर्णकर्कश आवाजाचा भरणा वाढत असताना, सोयगावच्या “समर्पण फाउंडेशन” संचलित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने संपूर्ण राज्याला एक नवा पायंडा घालून दिला आहे. समर्पण फाउंडेशनच्या या ‘संस्कारक्षम आदर्श शिवजयंती” चे संपूर्ण सोयगाव तालुक्यात कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now