जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांचे कमाल तापमान ३५ अंशावर गेले आहे. मात्र सलग दोन दिवस जळगावचे तापमान ३३ अंशापर्यंत होते. मात्र शुक्रवारी त्यात एकाच दिवसात तीन अंशांनी वाढून ते ३६ अंशांवर गेले. दुसरीकडे किमान तापमानात किंचित घट झाली.

जळगावचे शुक्रवारी किमान तापमान ९.८ अंश तर कमाल तापमान ३६.३ अंशापर्यत पोहोचले होते. सध्या जळगावच्या तापमानात चढ उतार दिसून येत आहे. या आठवड्याच्या बुधवारी आणि गुरुवारी तापमानात घट झाली होती. किमान तापमान १७ वरून थेट १० अंशापर्यंत घसरले. यामुळे रात्रीच्या वातावरणात गारवा वाढला आहे. काहीशी आद्रता देखील वाढल्यामुळे पहाटे जळगावकरांना गारवा जाणवतो आहे.
तर कमाल तापमानही ३३ अंशांपर्यंत घसरले होते. शुक्रवारी किमान तापमान ९.८ अंशांवर होते. मात्र, कमाल तापमान ३६.३ अंश नोंदवले गेले आहे. गुरुवारच्या तुलनेने ते तीन अंशांनी वाढले. येत्या ९ तारखेपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
तापमान ३८ अंशांवर जाणार असून दुपारी कडक उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव येणार आहे. पण, सध्या पहाटे आणि रात्री गारवा जाणवत आहे. या बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. दरम्यान, पहाटे एकीकडे वातावरणात गारठा तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील हा बदल आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक यांनी वर्तवली आहे. सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका या वातावरणामुळे लहान मुलांना व्हायरल फिव्हरचा सामना करावा लागू शकतो असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते आहे.