जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । मार्च महिन्यात तापमान चाळीशीपार गेले. त्यामुळे वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबत राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज सोमवारपासून प्राथमिक शाळा सकाळी ७ ते ११.१५ तर माध्यमिक शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरू शकतात.

उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल करावा, अशा मागणीची निवेदने विविध संघटनांकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. काही जिल्ह्यांनी सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याबाबत आदेश निर्गमित केले. परंतु, सर्व जिल्ह्यांत शाळांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असण्यासाठी राज्यातील सर्व शाळा शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार भराव्यात, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
दरम्यान राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.यात १ ते ३ एप्रिल दरम्यान जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळेस पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात बुधवारी तीन ते दहा मिलिमीटर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात हवेची गती ताशी १५ ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.