जळगाव लाईव्ह न्यूज । होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकारण तापलं असून अशातच नेते-मंडळींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानं घराणेशाहीवरून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही आमदार पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खडसे कुटुंबावर टीका केल्याशिवाय आमदार पाटील यांचे समाधान होत नाही. मागच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अनेक विकास कामे मुक्ताईनगर मतदारसंघात आणली. परंतु, आमदार पाटील यांनी त्यात आडकाठी आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या आरोपांचे खंडन करत उलट त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मुक्ताईनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा केल्याचा दावा त्यांनी केला.

रक्षा खडसे यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री असताना आजपर्यंत मुक्ताईनगरात एक स्टेडीयम आणू शकल्या नाहीत. त्यांनी मुक्ताईनगरसाठी १० लाखांचा निधी दिल्याचे दाखवून द्यावे. मी काम थांबवले म्हणण्यापेक्षा तुम्ही काय काम केले ते दाखवा, असेही आव्हान त्यांनी रक्षा खडसेंना दिले आहे. मुलगी संजना नगराध्यक्षपदाची उमेदवार असल्याने मुक्ताईनगर शहराच्या विकासासाठी आगामी काळात आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार पाटील म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर आताची ही निवडणूक आम्ही लढत आहोत, असे सांगून आतापर्यंत मुक्ताईनगरचा कायापलट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान मुक्ताईनगरातील नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) असा सामना रंगला असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांच्या कन्या संजना पाटील यांना मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे संजना पाटील विरूद्ध भाजप उमेदवार भावना महाजन, असा थेट सामना तिथे होत आहे.












