
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गणपती नगर परिसरात पायी जाणाऱ्या ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लक्ष्मीबेन पटेल (वय ७२) या गणपती नगरातील सुमन रेसिडेन्सीजवळून पायी जात असताना काळ्या कपड्यातील दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. काही कळण्याच्या आत दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. त्यानंतर दोघांनी भरधाव दुचाकीने घटनास्थळावरून पलायन केले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लक्ष्मीबेन पटेल घाबरल्या. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली असून, संशयित दुचाकीस्वारांचा शोध सुरू आहे.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, शहरातील नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्याने जाताना दागिने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.





